ज्या कपटी लोकांनी तुम्हा-आम्हाला छळलं, त्रास दिला त्यांचा निवडणुकीत सत्यानाश झाला”, असं वक्तव्य शिवसेनेच्या शिंदे गटातील नेते आणि माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी केलं आहे. खोतकर यांनी कोणत्याही व्यक्तीचं अथवा नेत्याचं नाव घेतलेलं नसलं तरी त्यांचा रोख त्यांचे जालन्यातील राजकीय प्रतिस्पर्धी रावसाहेब दानवे यांच्याकडे होता असं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात शिवसेनेच्या शिंदे गटाची एक आढावा बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिंदे गट जालन्यात तयारी करत आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला संबोधित करताना अर्जुन खोतकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच या वक्तव्यामुळे जालन्यातील शिवसेना भाजपातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याची चर्चा आहे.